टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील मार्बल मार्केट, चारचाकी-दुचाकी गाड्यांची शोरुम्स, आठवडी बाजार बंद राह आहे. तर गावातील सर्व दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ३० एप्रिल पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय ग्रा.पं. बैठकीत आज (गुरुवार) घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते. तर सपोनि. आंबले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज ग्रामपंचायत चौकामध्ये लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला गावातील किराणा माल व्यापारी, बेकरी व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल, ज्वेलर्स, कापड,  भांडी,  हार्डवेअर, केश कर्तनालय, सर्व दुकानदार उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी भोगम आणि तलाठी निलेश चौगुले यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यात येतील असे सांगितले. तर मार्बल मार्केट, चारचाकी दुचाकी गाड्यांची शोरुम, आठवडा बाजार बंद राहणार आहेत. तर उर्वरित गावातील इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील असे सांगितले.

याला इलेक्ट्रॉनिक, ज्वेलर्स, केश कर्तनालय, मोबाईल व्यावसायिकांनी विरोध केला. तुम्ही आमचा आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असाल तर आम्ही दुकाने बंद ठेवतो. अन्यथा, आम्ही दुकाने सुरू ठेवणार असा पवित्रा घेतला. यावर सरपंच शशिकांत खवरे यांनी गावातील सर्व दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन व्यापारांनी करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय येथील ग्रामदक्षता समिती आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी उपसरपंच सुरेश यादव, ग्रा.पं. सदस्य बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, उत्तम पाटील, दीपक यादव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजेश पाटील, मंडल अधिकारी बी. एल. जाधव यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.