कोल्हापूर (प्रतिनिधी) : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका तरुणाला अडीच लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आज (रविवार) कोल्हापुरात उघडकीला आला आहे. हा तरुण कापड व्यापारी असून त्याला या टोळीने सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या व्यापाऱ्याने दोनच दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, यातून त्याचा जीव वाचला आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ कोल्हापुरातही हनीट्रॅपचा हा दुसरा प्रकार  उघडकीला आल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यापाऱ्याची एका अल्पवयीन युवतीबरोबर काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर संबंधित युवतीने याच्याशी मैत्रीचे संबंध वाढवले. त्यानंतर युवतीने तरुणाला भेटण्यास बोलवले असता तो तिथे गेला होता. यानंतर या मुलीच्या  साथीदाराने या व्यापाऱ्याला गाठत त्याच्याकडून रोख रक्कम, सोने असा अडीच लाखांचा ऐवज काढून घेतला. परंतु, घटनेनंतरही पैशांची मागणी होऊ लागल्याने या व्यापाऱ्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधून ही गोष्ट सांगितली. यावेळी स्थानिक गुन्ह अन्वेषणच्या पोलीसांनी सापळा रचून युवतीसह तिच्या सहा साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

यामध्ये सागर पांडुरंग माने (वय ३२, रा. कळंबा), सोहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे (रा. राजारामपुरी), आकाश मारुती पाटील (रा. यादवनगर), लुकमान शकील,  (रा. जवाहरनगर), सौरभ गणेश चांदणे (रा. म्हाडा कॉलनी) यांचा समावेश आहे. तर यातील म्होरक्या सागर माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

या टोळीकडून फसवणूकीचे प्रकार झाले असल्यास संबंधितांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषनचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केले आहे.