मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. त्यांना कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे गरीब, सर्वसामान्य वीज ग्राहकांना शॉक बसणार आहे.

ते म्हणाले, ‘लॉकडाऊनमध्ये आलेली बिले भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत. कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही. तुम्ही जसे ग्राहक आहात तसे आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हाला सुद्धा वीजेची बिले द्यावी लागतात. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे त्यांना बिल भरावे लागेल.’

त्याचबरोबर, ‘वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी, मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलतीच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी केली. पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही.’