टोप (प्रतिनिधी) : शिये, शिरोली एमआयडीसी परिसरात ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर तरुणांची संख्या वाढत आहे. यामुळे तरुण पिढी आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत. येथे ऑनलाइन परीक्षा केंद्र, हाकेच्या अंतरावर शाळा असल्याने या परिसरातील व्हिडिओ गेम बंद करण्याची मागणी शिये ग्रा.पं. सदस्या तेजस्विनी पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ दौलत देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, शिये, शिरोली एमआयडीसी परिसरात ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लर खुलेआम सुरू आहेत. कोरोना काळात गेले आठ ते नऊ महिन्यांपासून व्हिडिओ गेम पार्लर बंद होती. मात्र, ते पुन्हा सुरू झाली आहेत. यामुळे परिसरातील अनेक तरुण मंडळी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या काळात लॉक डाऊन करण्यात आले होते. त्यामुळे एमआयडीसी बंद ठेवण्यात आली होती. कामगारांना पगार मिळत नसल्याने आपला उदरनिर्वाह चालवताना कसरत करावी लागली होती. मात्र, पैसे मिळवण्याच्या नादात खासगी सावकार तसेच अनेकांकडून हात उसने घेऊन व्हिडीओ गेमच्या माध्यमातून झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडत आहेत.

या गेम पार्लरच्या परिसरात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून ऑनलाइन परीक्षांसाठी हजारो विद्यार्थी दररोज या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर हाकेच्या अंतरवर शाळा असल्याने व्हिडीओ गेम पार्लर बंद करावी. अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुख, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे शिये ग्रा.पं. सदस्या तेजस्विनी पाटील यांनी दिले आहे.