कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून आज (रविवार) कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये  सकाळी ९ वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन पुजन करण्यात आले. तसेच शिवराज्यभिषेक सोहळ्याचे प्रतिमापूजन करण्यात आले.

तसेच फिरंगोजी शिंदे सामाजीक संस्था संचलीत मर्दानी आखाडा गिरगावचे वस्ताद प्रमोद पाटील यांच्यातर्फे मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक, पोवाडा म्हणण्यात आले. तसेच चित्रकर्ती डॉ. अल्पना चौगुले यांनी जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींना शिव राज्यभिषेक सोहळ्याचे तैलचित्र प्रदान केलेबद्द्ल सत्कार करण्यात आला. कोव्हिड योध्दा कै. सुरेश देशमुख, परिचर यांच्या वारसांना ५० लाखांचा धनादेशाचे वितरण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राज्यशासनाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या ९ रुग्णवाहीका पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे खुर्द, अडकुर, कानुर खुर्द, मुंगुरवाडी,  गारीवडे, पिंपळगाव, पडळ, राशीवडे, पोर्ले तर्फ ठाणे यांना हस्तांतरीत करण्यात आल्या.

यावेळी जि.प.च्या कलामंचांने राष्ट्रगीत, शाहीर संकपाळ हायस्कूल रणदिवेवाडी या शाळेच्या राजू भोसले, प्रदिप सुतार, सहकारी यांनी पोवाडा, महाराष्ट्र गीत सादर केले. छ. शिवाजी महाराजांची सुबक व आकर्षक रांगोळी बाबासो कांबळे यांनी रेखाटली, छ. शिवाजी महाराजांच्या वेशात शैलेश पाटणकर, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी सरदार व मावळयांच्या वेशात  उपस्थित असल्याने जिल्हा परिषदेमध्ये शिवमय वातावरण तयार झाले होते.

यावेळी आ. ऋतुराज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील,  जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती प्रवीण यादव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ पद्माराणी पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासणे, माजी उपाध्यक्ष जि.प. सदस्य प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.