इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकंरजी येथे चलनासाठी आलेल्या बनावट नोटांच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी या नोटा तयार करणार्‍या टोळीचा छडा लावला. या टोळीतील आंबाजी सुळेकर आणि राजुभाई लवंगे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी १० लाख ५४ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. अशी माहिती उपअधीक्षक बाबुराव महामुनी आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.

येथील एका बँकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये साडेचार हजाराच्या बनावट नोटा सापडल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गतीनं तपास केला. या तपासात आयुब याने त्यांचा नातेवाईक रिक्षाचालक उस्मान शेख (रा. लक्ष्मीतिर्थ वसाहत, कोल्हापूर) याच्याकडून घेतल्याचं स्पष्ट झालं. शेखला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने बनावट नोटा बनवण्यासाठी टोळी कार्यरत असल्याचं तपासात समोर आलं. त्यानुसार कळंबे आणि सांगरुळ तसंच पासर्डे गावात संशयीतांचा शोध सुरू होता. आंबाजी सुळेकर याच्या सांगरूळ फाट्यावरील सुमन मोबाईल शॉपीवर छापा टाकला असता बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरत असलेला संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट नोटा मिळून आल्या.

त्याच्याकडे कळंबे इथला किराणा दुकानदार राजुभाई लवंगे याचाही त्यामध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं लवंगे यालाही ताब्यात घेतलं. या दोघांच्याकडून १० लाख ५४ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि यंत्रसामुग्रीही जप्त केल्याचे उपअधिक्षक बाबुराव महामुनी, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.

यावेळी उपनिरीक्षक प्रमोद मगर, इकबाल महात, नंदकिशोर कराड, उदय पाटील, प्रशांत ओतारी, इकबाल मणेर, रंजना कोरवी उपस्थित होते.