कोल्हापूर : विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील विद्यार्थिनी पूर्वा नाडगोडा हिची फुजित्सु लिमिटेड या जपानी कंपनीमध्ये नियुक्ती झाली असून, ती कंपनीच्या कामाकरिता दोन वर्षांसाठी जपानमधील टोकियो येथे प्रस्थान करीत आहे.
पूर्वा नाडगोडा हिने विदेशी भाषा विभागामधून जपानी भाषेचा सर्टिफ़िकेट व डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे. तिने विभागात दिल्या जाणाऱ्या जे.एल.पी.टी. या आंतरराष्ट्रीय परीक्षेच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाली. फुजित्सु लिमिटेड ही जपानी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान उपकरणे आणि सेवा देणारी बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपनी आहे. 1935 मध्ये स्थापना झालेल्या या कंपनीचे मुख्यालय टोकियो येथे आहे. पूर्वा नाडगोडा ही आता या कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करीत असून, एप्रिलमध्ये दोन वर्षांकरिता कंपनीच्या कामाकरता जपानला जात आहे. त्या निमित्ताने विदेशी भाषा विभागातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
पूर्वा नाडगोडा म्हणाल्या की, तिच्या या यशामध्ये शिवाजी विद्यापीठाचा खूप मोठा वाटा आहे. विभागातर्फे शिकविले जाणारे अभ्यासक्रम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणे ही आता फक्त मेट्रो शहरातील मक्तेदारी राहिलेली नसून कोल्हापूरसारख्या छोट्या शहरात शिकूनही अशा संधी मिळू शकतात.
विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थिनी पूर्वा नाडगोडाने मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी भूषणावह आहेच, पण इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एक इंजिनिअर व तरुण माता अशा व्यावसायिक आणि कौटुंबिक दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी पूर्वा ही जिद्द, मेहनत आणि क्षमतेच्या बळावर आपले करिअर घडवू शकली.
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागामध्ये रशियन, जर्मन, जपानी, फ्रेंच व पोर्तुगीज या भाषा शिकविल्या जातात. याचा कोल्हापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी पूर्वा नाडगोडा यांच्याशी मुक्त संवाद साधला. या कार्यक्रमास विविध विद्याशाखांतील विद्यार्थी, शिक्षक, पवन नाडगोडा उपस्थित होते. जपानी भाषा शिक्षिका स्नेहल शेट्ये यांनी आभार मानले.