Published June 7, 2023

कोल्हापूर : शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बीज पेरले; मात्र हे काम सांघिक आहे, असा विचार त्यांनी पेरला. हेच त्यांच्या स्वराज्य निर्मितीचे गमक होय. स्वराज्यनिर्मितीतून त्यांनी नवसमाज निर्मितीचा पाया घातला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित ‘शिवरायांची स्वराज्याची संकल्पना’ या विषयावरील जाहीर व्याख्यानामध्ये डॉ. नंदकुमार मोरे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, भारताच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाच्या वाटचालीत कधी झाली नव्हती, अशी घटना ३५० वर्षांपूर्वी घडली, ती म्हणजे शिवराज्याभिषेक होय. शिवाजी महाराजांकडे कल्पकता, धाडसी वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, दूरदृष्टी आणि सौजन्य दिसून येते. नवीन समाजरचना, नवीन राज्य व्यवस्था प्रत्यक्षात अंमलात आणली म्हणून त्यांच्या कार्याचे मोल अधिक आहे. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या चारित्र्याला आणि रयतेच्या सुरक्षिततेला ते प्राधान्य दिले, असे इतिहासकार सांगतात. त्यामुळेच त्यांनी सुसंस्कृत आणि चारित्र्यवान लोक उभे केले.

प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी ‘शिवराज्यभिषेक: स्वरूप आणि महत्त्व’ या विषयावर विवेचन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य संकल्पना राबविण्याचे आणि समाजबांधणीचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे केले. ३५० किल्ल्यांपैकी १४० किल्ल्यांची त्यांनी डागडुजी केली. गडकोट म्हणजे राज्याची सुरक्षितता. महाराजांचे राज्याभिषेक झालेला नसल्यामुळे धार्मिक आणि प्रशासकीय अडचणी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत. तीस वर्षांमध्ये महाराजांनी स्वराज्याची यंत्रणा, नितिमत्तेचा आधार उभा केला. त्यासाठी अखंड मेहनत घेतली. अडचणींचे निराकरण करण्यासाठी आणि प्रशासन अधिक सोयीस्कर होण्यासाठी राजांनी वयाच्या ४४ व्या वर्षी राज्याभिषेक केला.

डॉ. पठाण पुढे म्हणाले, शिवाजी महाराज फक्त मातृभक्तच नव्हते तर ते पितृभक्तही होते. रायगडाची सुरक्षितता निश्चित केल्यानंतर राज्याभिषेकास शिवाजी महाराज तयार झाले. राज्याभिषेकाचे निमंत्रण महाराजांनी देशभरातील सर्व विद्वानांना दिले होते. राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी महाराजांनी स्वत:च्या नावाचा कधीही उपयोग केला नाही. उलट, आपल्या शूर सैन्याचा आणि सरदारांचा वेळोवेळी सन्मान केला.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिवचरित्र वाचलेच पाहिजे, असा चंग बांधला पाहिजे. अनेक गडकोट, किल्ल्यांची उभारणी करणारे स्वराज्याचे वास्तूविशारद म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले पाहिजे. सैन्यामध्ये राष्ट्रभावना निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचे कर्तृत्व देशाच्या अन्य भागात पोहचले आहे. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023