गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज साखर कारखाना आम्हा कर्मचाऱ्यांचा, शेतकरी, सभासदांचा आहे. तो तुमच्या-आमच्या घामावर उभा आहे. आज कारखाना ‘ब्रिस्क’  पुणे या कंपनीकडे चालवायला दिला आहे. पण या कंपनीशी झालेला करार इंग्रजी भाषेत आहे. हा करार मराठीमध्येच हवा. कर्मचाऱ्यांनी गुलामासारखे वागू नये. आपण कुणाच्या घरचे नोकर नाही हे लक्षात घेऊन काम करा. हा आमचा कारखाना आमचा असताना न्याय मागण्यासाठी कोर्टात का जायचे, असा सवाल बड्याचीवाडीचे माजी सरपंच शिवाजी खोत यांनी केला. निवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर फंड, ग्रॅच्युइटी दिलीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

गडहिंग्लज येथे आज (सोमवार) लक्ष्मी मंदिरात साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात बोलत होते. खोत म्हणाले की, राज्यात केवळ आर. आर. आबांसारखा एकच नेता स्वकर्तृत्वावर पुढे आला. आपले नेते कुणालाच पुढे येऊ देत नाहीत. मला पद्धतशीर बाद करण्याचं काम चालू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळं कुणी केलं हे मला जनतेला सांगावच लागेल. कर्मचाऱ्यांचे १७ कोटी द्यावेच लागतील. गडहिंग्लज तालुका समृध्द आहे, कारखान्याच्या शेजारी उसाचे मळे आहेत, मग कारखाना तोट्यात कसा चालतो ? १४ तारखेला गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर आपल्याला आंदोलन करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी कारखान्याचे बहुसंख्य निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.