रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणात विनाशकारी प्रकल्प नको, अशी भूमिका घेत शिवसेनेने स्थानिक जनतेसह जैतापूर अणु उर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. आता सत्तेत आल्यावर मात्र शिवसेनेची भूमिका बदलली आहे. स्थानिकांना ९० टक्के मोबदला मिळाल्यामुळे जैतापूर प्रकल्प व्हावा, असे मत शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मांडले आहे. त्याचप्रमाणे नाणार प्रकल्पालाही असलेला स्थानिकांचा विरोध मावळला आहे. त्यामुळे तोही प्रकल्प होण्यास काही हरकत नाही, असे साळवी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकल्पांना अगदी टोकाचा विरोध करणारी शिवसेना सत्ता येताच कशी बदलली, असा सवाल होत आहे.

जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. ९० टक्के स्थानिकांनी जागेचा मोबदला स्विकारला आहे. तसेच स्थानिकांची भूमिकाही बदलली आहे. आता त्याबाबतीतील भूमिका केंद्र सरकार घेईल, असे राजन साळवी म्हणाले. नाणार प्रकल्पाबाबतही स्थानिकांचा विरोध मावळला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिकांचे मत महत्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिकांच्या विरोधासोबत शिवसेना होती. आता स्थानिकांनी भूमिका बदलल्याने शिवसेनेनेही आपली भूमिक बदलली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत आल्यानंतर जैतापूर, नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलली, अशी चर्चा सुरू झाली आहे.