औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

0
179

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची सातत्याने कोंडी करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई  यांनी चांगलेच फटकारले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेला टोमणे मारते. चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती. तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा खरमरीत सवाल सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला.

औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही? त्यामुळे आता भाजपने आम्हाला उपदेश करण्याची गरज नाही. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करणारच आहे.