राज्यसभेसाठी शिवसेनेचे धक्कातंत्र ? कोल्हापुरातून या शिवसैनिकाच्या नावाचा होतोय विचार !

0
890

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेसाठी आता छत्रपती संभाजी राजेची भूमिका काय? हा प्रश्न गेल्या 24 तासात पासून समाज माध्यमांवर ती चर्चिला जात आहे. कारण संभाजी राजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा मगच त्यांना राज्यसभेची तिकीट दिली जाईल असा प्रस्ताव आणि काही अटी शिवसेनेनं त्यांना दिल्या होत्या परंतु या अटी संभाजीराजे यांना मान्य नसल्याचे सूत्राकडून समजते म्हणूनच शिवसेनेने ‘बी’ प्लॅन आखत राज्यसभेसाठी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर तसेच धक्कातंत्राचा वापर करत चौथे नाव म्हणून कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार ही नावे राज्यसभेसाठी पुढे आणली आहेत.

13 मे रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी आपण अपक्ष लढणार आहोत, आपल्याला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असे सांगितले होते. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना जो उमेदवार देईल त्याच्या मागे आपण उभे राहू असे वक्त्यव्य एका कार्यक्रमादरम्यान केले होते. या सर्व गोष्टींची बांधणी करत शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आमंत्रित करून तुम्ही शिवबंधन बांधा आम्ही शिवसेनेकडून आपली उमेदवारी जाहीर करू असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता

परंतु काहीच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’ या संघटनेची घोषणा करून या संघटनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणाचे आपले काम चालूठेवू  असे सांगितले होते. अशा परिस्थितीत जर शिवसेने कडून राज्यसभा मिळवली तर ‘स्वराज्य’  संघटनेचे काय होणार ? कार्यकर्त्यांना कोणता संदेश जाणार ? याच्यावरती खल झाला आणि त्यातूनच भविष्यात स्वराज्य संघटनेची बांधणी करायचे असेल तर आपल्याला सेनेसोबत जाता येणार नाही असा कयास छत्रपती संभाजीराजे यांनी बांधला असावा म्हणूनच शिवसेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजे सकाळीच मुंबईहून कोल्हापूरकडे परतले व आपण अजूनही अपक्ष लढणार या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी आपल्या या कृतीतून जाहीर केले. या सगळ्या घडामोडी चालू असताना शिवसेनेने देखील आपला बी प्लॅन तयार ठेवला, त्यानुसार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरु ठेवली असतानाच काल आश्चर्यकारकरीत्या शिवसेनेने कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचे नाव पुढे आणल्याची माहिती सूत्राकडून कळते. 25 पेक्षा अधिक वर्षे संजय पवार यांनी निष्ठेने शिवसेनापक्षाचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षाने अणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी दिली व सध्या ते जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

शिवसेनेमध्ये नेहमीच कट्टर शिवसैनिकांना डावललं जातं असा सोयीस्कर संदेश विरोधी पक्षातून सातत्याने पसरवला जात असतो, याला मात देण्याच्या दृष्टीतून व शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकाला पक्ष कधी डावलत नसतो हा संदेश या माध्यमातून देण्यासाठी संजय पवार यांचे नाव पुढे आणल्याचे असल्याचे सूत्रांकडून कळते. तसेच 2024 मध्ये ग्रामीण भागात बांधणी करण्यासाठी संजय पवार यांच्या सारखा कट्टर व एकनिष्ठ चेहरा समोर आणणे फायदेशीर ठरेल अशी आखणी करत यांना राज्यसभेत संधी देण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे समजते. परंतु येत्या काही दिवसातील घडामोडी ठरवेल की राज्यसभेसाठी शिवसेना कोणती चाल खेळून कुणाला पुढे आणेल. पण तूर्तास राज्यसभेची होणारी ही निवडणूक आता आणखीनच रंगतदार बनली हे नक्की.