शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामधील हरोली येथील मुलकी पड गट नं. ४२५  या ठिकाणी खाणकामासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आज (सोमवार) या मागणीचे निवेदन  नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना देण्यात आले.  

निवेदनात म्हटले आहे की, मुलकी गट क्रमांक ४२५ हा हरोली गावालगत आहे. त्याचबरोबर या गटालगतच गट क्रमांक ३६३ आहे. या गट क्रमांकमध्ये गावकऱ्यांसाठी घरकुल अंतर्गत घरे मंजूर आहेत व त्यांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. गावालगत असल्याकारणाने या गटामध्ये अजून ज्या नागरिकांना घरे नाहीत त्यांना घरकुल मार्फत घरे भविष्यात मंजूर होऊ शकतात. या गट क्र. ४२५  मध्ये मायनिंगसाठी किंवा खाणीसाठी परवानगी देऊ नये. विस्तारासाठी गावाकडे कोणत्याही प्रकारची जागा नाही. तसेच गावातील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही. ही जागा खाणकामासाठी न देता गावच्या विकासासाठी वापरात यावी.

या वेळी युवासेना उपतालुका प्रमुख वैभव गुजरे, शिवसेना शाखाप्रमुख रामदास सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते.