मुंबई (प्रतिनिधी) : गेली अडीच वर्षे शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विसंगत विचारसरणीशी जुळवून घेत पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड केली आहे. राज्य सरकारवर सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची राजकीय प्रतिमा यामुळे मलिन होत आहे, असा आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एका पत्रात केला आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिंदे आणि समर्थक आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात गेल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवल्याने उघड झाले आहे.

वर्षावरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली. त्यांच्याऐवजी अजय चौधरी यांची नेमणूक केल्यानंतर मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून सर्व आमदारांना पत्र पाठवून बैठकीस उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.

शिवसेनेच्या या खेळीवर एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर देताना त्यांच्या समर्थक ३४ शिवसेना आमदारांचे पत्र विधान भवनाला पाठवले आहे. या पत्रात २ ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवले आहे. त्यात २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. ती यापुढेही कायम राहील असा ठराव आहे. त्याचसोबत मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची निवड करण्यात आल्याचे नमूद करून सुनील प्रभू यांचे तातडीने मुख्य प्रतोद रद्द केल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पोलीस बदल्यांमधील घोटाळा, मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यासारखे मंत्री तुरुंगात असल्याने शिवसेनेचे आमदार आणि शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. मविआ सरकारमध्ये शिवसेनेसोबत असणाऱ्या अन्य लोकप्रतिनिधींकडून पदाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पक्षाचा कट्टर वैचारिक आधार असलेल्या आणि स्थानिक मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड झाली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड न करता दिले होते; परंतु २०१९ मध्ये भाजपासोबत युती बनवून त्यानंतर विचारधारेच्या विरोधात जात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बनवली. त्याचा नकरात्मक परिणाम मतदार आणि शिवसैनिकांवर झाला आहे. विद्यमान पक्षनेतृत्वाने शिवसैनिकांवर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे. शिवसैनिक व पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेतले जात नसल्याने पक्षात प्रचंड असंतोष आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.