इचलकरंजी (प्रतिनिधी) : गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉ. भाऊसाहेब काटकर यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांचे वकील पत्र कोणीही घेऊ नये, डॉक्टर दाम्पत्यावर कडक कारवाई करून हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा. अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना महिला आघाडीने निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन बार असोसिएशन व प्रांताधिकारी यांना आज (गुरुवार) दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. काटकर यांना २००९ साली याच कारणास्तव अटक झाली होती. तरीही याचे भय त्यांना नसल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. गर्भनिदान करणे हा स्त्री जातीचा अवमान आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्या डॉ. काटकर दाम्पत्यांवर कडक कारवाई करून हॉस्पिटल परवाना रद्द करावा. अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, शिवसेना नगर सेविका व पक्षप्रतोद उमाताई गौड, मंगल मुसळे, शोभा कोलब, मंगल लायकर, मधुमती खराडे, सुवर्णा धनवडे, मालती कोपडे, माधुरी टाकारे, हसीना शेडबाळे आदीसह महिला आघाडीच्या पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.