कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  निवडणूकीसाठी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून पतसंस्था  गटातून उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शिव-सहकार सेना जिल्हा संघटक संजय जाधव आणि मागासवर्गीय गटातून सुरेश कामरे यांनी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी सर्वच गटातून जिल्ह्यातील शिवसेनेच्या  एकूण २५ उमेदवारांचे  अर्ज दाखल झाले असून बँकेची निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे  यावेळी  शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

यावेळी मुरलीधर जाधव म्हणाले की, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी,कामगार,महिला आणि एकूणच सर्वसामान्य माणसांच्या हक्काचं आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे शिवसेना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाचं हित, सर्वांगिण विकास व तळागाळातील माणसाला स्वावलंबी बनवण्याचे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ध्येय आहे. ते डोळ्यासमोर ठेवून जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवसेना पूर्ण  ताकदीनिशी उतरत आहे. त्याचबरोबर  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम मानून कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसैनिक निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, इचलकरंजी शहरप्रमुख सयाजी चव्हाण, शिव-सहकार सेना हातकणंगले तालुका संघटक संदीप दबडे, किरण पडवळ, महेश बोहरा, आप्पासो पाटील, बाळासाहेब थोरवत, संजय वाईंगडे, अर्जुन जाधव, भरत देसाई, ऋषिकेश गौड, दत्ता साळुंखे, अजय घाटगे, शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.