शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे : एकनाथ शिंदे

0
311

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असून, शिंदे यांचा हा प्रस्ताव संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असल्याचे समजते.

नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये ३० हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

आमदार नितीन देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले. नंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.