औरंगाबाद (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षात उभी फूट पडून जी दुरवस्था झाली आहे त्याला स्वतः शिवसेना जबाबदार असून, असंगाशी संग केल्याचा हा परिणाम असल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

रावसाहेब दानवे म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत दिले होते; पण सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती करून सरकार स्थापन केले. शिवसेनेत जे बंड झाले आहे, त्यात भाजपचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले असले तरी पदाचा अद्याप राजीनामा दिलेला नाही. तिकडे शिंदे गट आणखी आक्रमक होऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली करू लागला आहे. जरी हे तीन पक्षांचे सरकार अडीच वर्ष टिकले तरी ते एक दिवस अंतरविरोधाने कोसळणार हे आम्ही सांगत होतो; पण आम्ही सरकार पाडणार असा आरोप सातत्याने महाविकास आघाडीचे नेते करत होते. तीन पक्षातील नेते, आमदारांमध्ये समन्वय नव्हता, असेही ते म्हणाले.

आमदारांची कामे होत नव्हती, त्यांनी निधी मिळत नव्हता हे आम्ही नाही तर त्यांचेच आमदार आज सांगत आहेत. त्यामुळे असंगाशी संग केल्याची मोठी किमंत शिवसेनेला आज मोजावी लागते आहे. आमच्याकडे कोणी सरकार स्थापन करायचा प्रस्ताव घेऊन आलेले नाही किंवा आम्ही त्यांना बोलावलेले नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.