मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प विधानसभेत सोमवारी मांडण्यात आला.  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली. पण अर्थसंकल्पाचे तसेच अर्थमंत्र्यांचे शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, याचं पुरेपूर भान ठेवत अर्थमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्रांचा आणि घटकांचा साकल्याने विचार करून एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला.

महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे.  अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो. जनतेच्या खिशातून नव्याने काही काढण्याचा कुठेही प्रयत्न दिसत नाही. या अर्थाने हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.