ठाकरे-फडणवीस यांच्यातील चर्चेचे शिवसेनेकडून खंडन

0
58

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे बोलले जात असून, फ्लोअर टेस्ट होणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या या घडामोडींदरम्यान फडणवीस आणि ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याच्या वृत्ताने चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन करत बंड पुकारले. या सर्व आमदारांना पुन्हा बोलवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावनिक आवाहन करत शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा परतण्यास सांगितले. मात्र, बंडखोर आमदार हे मविआमधून बाहेर पडण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या चर्चेनंतर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शिवसेनेकडून सांगण्यात आले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरुन चर्चा झाली अशा बातम्या प्रसारित होत आहेत; मात्र तसे काहीही नाही. उद्धव ठाकरे जे बोलायचे आहे ते खुलेपणाने बोलतात.

दरम्यान भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी पार पडली. बैठकीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सरकार स्थापनेवर कुठलीही चर्चा झाली नाही. शिवसेनेचे गटनेता एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेकडून भाजपकडे प्रस्ताव आला तर बैठक घेऊन विचार करु. बैठकीत उचित निर्णय घेतला जाईल.

अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची सध्या गरज वाटत नाही. बहुमत चाचणीच्या मागणीची आज तरी गरज वाटत नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतियांश आमदार आहेत, तर मग त्यांना बंडखोर कसे म्हणणार? असा सवालही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.