गुवाहाटी (वृत्तसंस्था) : बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर एका खासगी विमानाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह ५१ आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्व्हेन्शन’ या हॉटेलमध्ये थांबतील आणि गुरुवारी सकाळी मुंबईला पोहचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोव्यातील ‘ताज कन्व्हेन्शन या हॉटेलमध्ये ७१ खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत. यानंतर बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुरुवारी बहुमत चाचणीसाठी मुंबईत हजर राहणार आहेत.

गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी बुधवारी सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. आशीर्वाद घेण्यासाठी कामाख्या मंदिरात गेले होते. पहिल्यांदाच आमदार दोन मोठ्या बसेसमधून हॉटेलमधून बाहेर पडले. शिंदे यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी मी कामाख्या मंदिरात गेलो होतो. त्यासाठी मी कामाख्या मातेचा आशीर्वाद मागितला आहे.