मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना मविआमधून बाहेर पडायला तयार आहे.  २४ तासांच्या आत बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले म्हणणे मांडावे, अशी मोठी ऑफर खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळचे वळण लागले आहे. हा सर्व अट्टाहास फक्त मविआतून बाहेर पडण्यासाठी करण्यात आला होता का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिंदे यांच्या गटातून सुटका करून आलेल्या कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्यावर बेतलेले प्रसंग प्रसार माध्यमांसमोर सांगायला लावले.

बंडखोर आमदारांनी गुवाहाटीहून संवाद साधू नये. त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. सर्व आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करण्यास तयार आहोत, परंतु त्यासाठी त्यांना येथे यावे लागेल. गुवाहाटी येथे असलेले २१ आमदार यांना धमकी देऊ तिथे ठेवण्यात आले आहेत. ते मुंबईत परत आल्यावर पुन्हा शिवसेनेत सामील होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.