शिवसेना- काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती : देवेंद्र फडणवीस

0
68

नागपूर (प्रतिनिधी) : औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्या अजेंड्यावर आणला आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यास विरोध केला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा शिवसेनेला आठवतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल. काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, पण शिवसेना हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीचा खेळ सुरु आहे.  दरम्यान, २०२० हे वर्ष आपल्याला मोठे आव्हानात्मक गेले आहे. २०२१ हे वर्ष सुखा समाधानाचे जावो, हीच शुभेच्छा असल्याचे ते म्हणाले.