मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सुरु असलेले राजकारण हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु केले आहे, शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करुन गुजरातला नेण्यात आले आहे. आमदारांवर गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे, तिथे जीवाला धोका असल्याचे आमदार सांगत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला कोणीही तोडू शकत नाही. अजय चौधरी यांची गट नेतेपदी निवड करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे आमचे चांगले मित्र असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे. त्यांच्या मनातील शंका दूर होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना अपहरण करुन त्याठिकाणी नेण्यात आले आहे. या सर्व आमदारांना गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी हॉटेलमधून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याविरुद्ध दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

अशाप्रकारचे वादळ हे शिवसेनेच्या आयुष्यात काही पहिल्यांदाच आलेले नाही. या सगळ्यातून शिवसेना पुन्हा उठून उभी राहिले आहे. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत. त्यांच्या मनात नाराजी असेल, तर त्यांनी मुंबईला येऊन चर्चा करावी. सुरतला जाऊन त्यांच्याशी चर्चा करणे, हे पक्षशिस्तीत बसणारे नाही, असे राऊत यांनी सांगितले.