मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितले.