मुंबई (प्रतिनिधी) : देशभर शेतकऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. बळीराजा आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद असायला हवी होती. मात्र मोदी सरकारने सामान्यांसाठी हे बजेट आणले नाही, तर हे बजेट उद्योगपतींसाठी आणले आहे, अशी जोरदार टीका शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केली.

केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक आहे. महाराष्ट्र राज्यही केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत होता. परंतु सगळ्यांचीच निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राच्या तर तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्राने केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, त्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा यासाठी शेतकरी गेले दोन महिने रस्त्यावर उतरलेला आहे. मात्र केंद्राला या शेतकऱ्यांचे काहीही देणंघेणे नाहीय. शेतकऱ्यांच्या संदर्भातला कुठलाही निर्णय केंद्राने घेतलेला नाही. शेतकरी कर्जामध्ये बुडालेला आहे. त्या शेतकऱ्याला बुडालेल्या कर्जातून बाहेर काढण्यासाठी कुठलेही मोठे पॅकेज या सरकारने दिलेले नाही.