दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर काही संघटनांनी माघार घेतल्यामुळे आंदोलन थंडावेल असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा या आंदोलनाने जोर धरला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी आज गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार आम्ही शेतकऱ्यांना भेटायला आलो आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या सुख दुख:त सहभागी होतात. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत, असे ट्विट या भेटीपूर्वी संजय राऊत यांनी केले होते.