कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी वीज वितरण कंपनीच्या उचगाव व गांधीनगर येथील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरू केला. या साहसी कृत्याबद्दल करवीर शिवसेनेच्या वतीने या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वीज वितरणचे उचगाव येथील कर्मचारी किरण कोळी, विशाल ठाकूर व गांधीनगर येथील कर्मचारी नितीन कांबळे, अमित चौगुले, अमित पवार, सुनील खटावकर, सुशील कांबळे या कर्मचाऱ्यांनी महापुराच्या पाण्यात उतरून विजेच्या पोलवर चढून उंचगाव व गांधीनगर येथील वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत केला. जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल जनतेच्या वतीने करवीर शिवसैनिकांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, या धाडसी लोकसेवकांचा आदर्श सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घ्यावा. उचगावचे शाखा अभियंता रघुनाथ लाड व गांधीनगरचे शाखा अभियंता अतुल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरणच्या या सहा कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.

विनायक जाधव, संतोष चौगुले, शरद माळी, महेश खांडेकर, वीरेंद्र भोपळे, विराग करी, महादेव चव्हाण, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटीळक व प्रफुल्ल घोरपडे, फेरीवाले संघटनेचे कैलास जाधव, दत्ता फराकटे, अजित चव्हाण, अजित पाटील, बंडा पाटील, दत्तात्रय विभूते, नितीन कांबळे यांनी उचगाव येथील वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, विभागप्रमुख दीपक पोपटाणी, दीपक अंकल, किशोर कामरा, जितू चावला, विनोद रोहिडा, राजेश सचदेव यांनी गांधीनगरमधील वीज वितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.