मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आशिष शेलार यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तीने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केले. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, असा सवाल शेलार यांनी यावेळी केला.  

शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केले. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही. नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले. सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळाले, त्यावेळी ठाकरेंनी तेच केले. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळाले म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज साडे चारच्या सुमारास निकाली निघाला होता. त्याआधीच मंत्री अनिल परब सांगतायत की जामीन नाकारण्यात येणार आहे. याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केल्याची दाट शंका आहे, असा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.