विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध : राजेश क्षीरसागर

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासह येथील प्राचीन मंदिराचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून प्राचीन मंदीरांचे अस्तित्व कमी होत आहे. असे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीने आज (सोमवार) राजेश क्षीरसागर यांना दिले.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, विशाळगडावरील २१ हून अधिक मंदिरांचा विकास न होता त्यांचा आकार कमी झाला. त्या जागेवर अतिक्रमण झाले. या खूप गंभीर गोष्टी असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलणार आहे. तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पूरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने बैठक लावून गडावरील अतिक्रमण काढण्याविषयी सूचना देण्यात येतील असे ही यावेळी क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ता सुनील घनवट, समन्वयक किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री,  बाबासाहेब भोपळे, पदाधिकारी उपस्थित होते.