मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल कोट्यातून होणार आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना याबाबत मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. उर्मिला मातोंडकरला पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा  मीदेखील ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रिमंडळाने अधिकार दिले आहेत.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमधून विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेची चार नावे निश्चित झाल्याचे कळते. तर दुसरीकडे काँग्रेसमधूनही उर्मिला मातोंडकर यांचे नांव पुढे आले होते.