कोल्हापूर (प्रतिनिधी) : भूमिअभिलेखच्या करवीर कार्यालयात मयत महिला जिवंत दाखवून गुंठेवारी प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. तसेच या कार्यालयात शेकडो बेकायदेशीर प्रकरणे करून भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज (सोमवार) शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली भूमिअभिलेख कार्यालयाला घेराव घालून जोरदार निदर्शनं करण्यात आली. प्रांताधिकाऱ्यांच्या सहीशिवाय मंजूर झालेला लेआऊट आठ दिवसात रद्द करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा संजय पवार यांनी दिला.

 

बालिंगा (ता. करवीर) येथील सावित्रीबाई माळी या २०१३ साली मयत झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या नावे, फोटो, स्वाक्षरी म्हणून अंगठा दाखवून ११ मे २०१८ ला उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, सदर प्रकरण मोजणी करून ३१ मे २०१८ ला निकाली काढण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. यासह भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेने आज आंदोलन केले. या आंदोलनात सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, राजू यादव, विनोद खोत, भगवान कदम, भीमराव पाटील, तानाजी आंग्रे, सुरेश पोवार, भारत भापकर, शुभांगी पोवार, स्मिता सावंत यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.