कोल्हापूर : येथील ‘शिवालय’ भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. कैलासगडची स्वारी मंदिराच्या ‘शिवालय’ भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची रायगडवर शिवराज्याभिषेकास जाण्याची परंपरा गेल्या ५० वर्षे सुरू आहे.
यावर्षी शिवालय भजनी मंडळाच्या परंपरेचा सुवर्णमहोत्सवी शिवराज्याभिषेकदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भव्य दरबार हॉल हा ऐतिहासिक सेट उभारण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दि. ४, ५, ६, जून या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व राजदरबारचे उद्घाटन युवराज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, संजय पवार आणि विजय देवणे (जिल्हाप्रमुख शिवसेना) विनायक साळोखे (माजी जिल्हाप्रमुख शिवसेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी ७ ते १० या वेळेत धर्मवीर संभाजीराजे (लोककला शाहिरी पथक) शाहीर संजय जाधव (मिणचेकर) यांचा पोवाडा होणार आहे. सोमवार, दि. ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भागातील महिलांचा कुंकूमार्चन सोहळा श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती व आ. जयश्री जाधव, वैशाली राजेश क्षीरसागर, डॉ. दश्मिता जाधव यांच्या हस्ते सुरू होणार आहे. रात्री ७ ते ८ या वेळेत मर्दानी खेळाच्या आखाड्याचे पूजन व प्रारंभ सत्यजित कदम व पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये शिवरायांवरील चित्रफित दाखवण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता करवीर पीठाचे जगद्गुरु विद्यानृसिंह भारती शंकराचार्य महाराज तसेच कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते दत्तोबा बारड, बाळासाहेब देसाई व मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व आ. जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार ऋतुराज संजय पाटील, शिवालय भजनी मंडळाचे बाळासाहेब पोवार, प्रदीप रणदिवे, दिलीप जाधव, शिवभक्त, महिला व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेच्या पूजनाचा सोहळा होईल. रात्री ९ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम व प्रसाद वाटप होणार आहे.
यावेळी अध्यक्ष प्रदीप साठे, उपाध्यक्ष विवेक कोरडे, विलास गौड, खजानिस किशोर भोसले, शाहीर अजित आयरेकर, बाबासो शिंदे, अजित जाधव, राजू जाधव, रोहित कारंडे, बबन कांबळे, राजू काटे, अनिल गौड आदी उपस्थित होते.