शिंगणापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेत शिक्षकांची रिक्त पदे आणि कोव्हिड सेंटर संदर्भात काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याची जि.प. शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यांनी तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिक्षणाधिकारी आशा उबाळे व आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याशी चर्चा केली. तसेच शिंगणापूर क्रीडा प्रशाला सोमवारपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

रसिका पाटील म्हणाल्या की, शिंगणापूर क्रीडा प्रशालेत शिक्षकांच्या पाच जागा रिक्त होत्या. त्यापैकी दोन शिक्षक निवृत्त तर तीन जागा शिक्षकांना बढती मिळाल्याने रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन शिक्षक सोमवारपासून शाळेत रुजू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोव्हिड सेंटर बंद करून सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना कोव्हिड सेंटर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना सोमवारपासून शाळा सुरू सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.