मुंबई (प्रतिनिधी) : २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले ते २०१४ मध्येच होणार होते. भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंसुद्धा सहभागी होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यालयातच माझी भेट सुद्धा घेतली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे नवे सरकार स्थापन केले. मविआ सरकार स्थापन झाल्याने भाजपाला धक्का बसला. त्यामुळेच सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.

चव्हाण म्हणाले, भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने त्यावेळी घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच घेण्यात आली होती, असा खुलासाही अशोक चव्हाण यांनी केला. यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करणे योग्य राहील, असे अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुचवले, शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याने पवारांची भेट घेतली नाही; पण या संदर्भात पुढे काय झाले याची माहिती नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

गेली अनेक दिवस शिंदे गटातील नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्याने आम्ही बाहेर पडलो असे म्हणत आहेत. मात्र, शिवसेनेकडून काँग्रेसला युतीचा जो प्रस्ताव दिला त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे असल्याने त्यांच्या आता शिवसेनेतून बाहेर पडण्यावर राजकीय वर्तळुात शंका निर्माण हाेऊ लागली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, पक्षाने सांगितल्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यावेळी शिष्टमंडळात सहभागी झाले असतील. अशोक चव्हाणांच्या बोलण्यात तथ्य नाही. सोनिया गांधींनी त्यांना शिवसेनेसोबत जा असे सांगितले असेल, तर तसे जावे लागेल म्हटल्याने राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आले आहे.

२०१९ च्या निवडणुकांदरम्यान प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला. त्याचप्रमाणे शिवसेना-भाजप यांनी एकत्रित प्रचार केला; पण निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने राजकीय खेळी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती करत सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, असे चव्हाण यांनी सांगितले.