गुवाहाटी (वृत्त्संस्था) : शिवसेनेतून वेगळा गट स्थापन करणारे नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्यास सरकार कोसळू शकते. शुक्रवारी शिंदे गट आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तारुढ करण्यासाठी त्यांच्याकडून तासातासाला मोर्चेबांधणी केली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असल्याचे पत्र शुक्रवारी हे आमदार राज्यपालांना देतील. त्याचवेळी शिंदे समर्थकांच्या शिरगणतीचीही तयारी आहे.  त्यानंतर काही तासातच शिंदे गट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचीही भेट घेऊन विधीमंडळ गटनेतेपदी शिंदेंच्या निवडीचे पत्र देईल. तेथेही सह्यांची तपासणी, शिरगणती होईल आणि प्रतोदपदी भारत गोगावलेच असल्याचेही पत्र दिले जाण्याची शक्यता आहे.