मुंबई (प्रतिनिधी) : बंडखोर शिंदे गट आणि भाजप यांच्या सत्तास्थापनेसाठी खलबते सुरू आहेत. लवकरच राज्यपालांना अविश्वासदर्शक ठराव देण्यासंदर्भात हालचालीही सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मंगळवारी दिल्लीला गेले आहेत. ते अमित शहांची भेट घेऊन या नव्या सत्ता समीकरणावर चर्चा करणार आहेत.

शिंदे गटाने भाजपसह सरकार स्थापन करण्यासंदर्भात मंथन केले आहे. यानुसार जर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली तर शिंदे गटातील आठ जण कॅबिनेट मंत्री आणि पाच जण राज्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर ठेवण्यात आले आहे, तर गुलाबराव पाटील, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय शिरसाट, उदय सामंत यांना ही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. यामुळे हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यांनी बहुमत चाचणी घ्यावी. आम्ही लगेच गुवाहाटीतून महाराष्ट्रात यायला तयार आहोत. दुसरीकडे, मुख्यमंत्री ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची चर्चा होती. शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी स्पष्ट केले की, अशा बातम्या या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये.

शिवसेनेने अपात्रतेची नोटीस दिलेल्या १६ आमदारांच्या याचिकेवर सुनावणी देताना सोमवारी सुप्रीम कोर्टाने १२ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेना गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू व केंद्र सरकार यांना पाच दिवसांत म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली. या निर्णयामुळे शिंदेसेनेला तूर्त दिलासा मिळाला असला तरी अपात्रतेची कारवाई टळलेली नाही.

आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते बंडखोरांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा धमक्या देत असताना सरकारी वकील चिटणीस यांनी मात्र आमदारांच्या सुरक्षेबाबत न्यायालयात लेखी हमी दिली. ३९ आमदारांच्या जीवितास, अधिकारास व संपत्तीला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची हमी घेतली आहे,’ असे ते म्हणाले. या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लवकरच बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे.