आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात प्रचंड मोठी राजकीय घडामोडी घडल्या आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी आणि जिल्हा बँकेचे विद्यमान सदस्य अशोकआण्णा चराटी या दोघांनी एकत्र येत  युतीची घोषणा केली. आण्णाभाऊ सूतगिरणीवर झालेल्या मेळाव्यात ६० ठराव धारकांची उपस्थिती होती. तर जिल्हा बँकेसाठी जयवंतराव शिंपी यांनी अशोक आण्णा चराटी यांची उमेदवारी जाहीर केली. तालुक्यात एकूण १०५ठराव पत्र आहेत.

यावेळी चराटी म्हणाले की, आमच्या दोघांमध्ये समन्वय नसल्याने आमच्या दोघांचे राजकीय नुकसान झाले. कारखान्यात विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. यापुढे आम्ही दोघेजण तालुक्याच्या विकासासाठी झटणार आहोत. आमची समझोता एक्सप्रेस सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिदू ठेऊन राहणार आहे. तर येणाऱ्या काळात ठरावधारकांची संख्या ७० च्या वर जाणार असून जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आपला बहुमताने विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास चराटी यांनी व्यक्त केला.

जयवंतराव शिंपी म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. यापुढील सर्व निवडणुका आम्ही दोघे एकत्र लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित असणाऱ्या ६० ठरावधारकांची हजेरी घेण्यात आली.

यावेळी भिकाजी गुरव, जनार्दन टोपले, बशीर खेडेकर, विश्वनाथ करंबळी, डॉ अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोस्कर, विलास नाईक, दशरथ अमृते, संजय पाटील, मुकुंद तानवडे, मधुकर एल्गार, बाबुराव नाईक, नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.