कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षाचालक बेरोजगार झाले आहेत. रिक्षाचालकांची सात महिन्यांची वीजबीले पूर्णपणे माफ करण्यात यावी आणि उर्वरित वीज बीलांमध्ये सवलत आणि टप्पे देण्यात यावे. इंधनाचा दर स्थिर ठेवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. या मागण्यांसाठी आज (शुक्रवार) दसरा चौकात कोल्हापूर जिल्हा राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीने शिमगा आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाडेकरू रिक्षाचालकांना स्वत:ची घरे मोफत मिळावी, रिक्षाचालकांच्या  कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी. यासह विविध प्रलंबित मागण्या करण्यात आल्या. दरम्यान सरकारने रिक्षा चालकांच्या मागण्याकडे सकारात्मक पणे लक्ष न दिल्यास सरकार विरोधात व्यवसाय बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी संघटनेच्या वतीने शरद सोनुले यांनी दिला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार बोंब मारत निदर्शने करण्यात आली.

यावेळी मारुती पोवार, विजय बोंद्रे, दुर्गाप्पा पोवार, अंजूम शेख, संजय दणाणे, सुजित माळी, शंशिकांत निंबाळकर, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षाचालक उपस्थित होते.