शिखर धवनने दिले निवृत्तीचे संकेत

0
37

नवी दिल्ली : भारताच्या एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिखर धवन आहे. शिखर धवनने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे तो क्रिकेटमधून निवृत्त होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमधून या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. शिखर धवनने आता क्रिकेट सोडून फिल्मी दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.

शिखर धवनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. शिखर धवन फिल्म शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे या व्हिडिओत दिसते. ‘आली रे आली! आता तुझी बारी आली! लवकरच नवीन काहीतरी घेऊन येत आहे,’ अशी कॅप्शन त्याने या पोस्टला दिली आहे.

शिखर धवन याआधी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत ‘डबल एक्सएल’ चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. त्याच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओतून असे संकेत मिळत आहेत की, तो क्रिकेट सोडून नव्या भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ पाहिल्यास तो लवकरच फिल्मी दुनियेत आपली वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.