ब्रिटिश कालखंडातील शेणगांवची प्राथमिक शाळा सोसतेय मरणकळा..!

0
189

गारगोटी (प्रतिनिधी) : ब्रिटिश कालखंडात १ नोव्हेंबर १८५० रोजी स्थापन केलेली भुदरगड तालुक्यातील शेणगांवातील प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीला आली आहे. दुरुस्तीअभावी इमारत मरणकळा सोसत आहे. तरी या शाळेचे तत्काळ पुनरुज्जीवन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेणगांवचे सरपंच सुरेश नाईक यांनी दिला आहे.

७२ गुंठे क्षेत्रात वसलेल्या शाळेच्या इमारतीकडे शासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचबरोबर शेजारीच असलेली अंगणवाडीची इमारतही मोडकळीला आली आहे. त्यामुळे या इमारती धोकादायक बनल्या आहेत. कोरोनामुळे गेले वर्षभर शाळा बंद आहे. त्यामुळे इमारतींची दुरवस्था झाली आहे. इमारतीवरील कौले फुटून अस्ताव्यस्त झाली आहेत. तर छप्पर पूर्णत: जीर्ण झाले आहे. पशुपक्षांनी शाळेला आपले आश्रयस्थान बनवले आहे. कबुतरांचा मोठा वावर असल्याने शाळेचा कचराकोंडळा झाला आहे. शाळेसमोरील बागबगीचामधील झाडे, रूपटे यांनी माना टाकल्या आहेत.

ग्रामपंचायतीने वारंवार मागणी करूनही या शाळेकडे जिल्हा परिषदेची संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे, अशी खंत उपसरपंच मनिषा गुरव यांनी व्यक्त केली आहे. शाळेची दुरवस्था शेणगांवच्या अस्मितेला धक्का देणारी असून प्रशासन यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही वेळ आली आल्याचे ग्रामपंचायत सदस्या शिल्पा तेली यांनी म्हटले आहे.

१९२० मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कात कातण्याचा व्यवसाय शेणगांवमध्ये सुरु केला. त्यांनी येथे विश्रांतीसाठी धर्मशाळा बांधली. या धर्मशाळेचा वापर नंतर शाळेसाठी होऊ लागला. ७ वी पर्यंत येथे वर्ग भरू लागले. १९८० पर्यंत या शाळेने वैभवाचे दिवस पाहिले. मौनी विद्यापीठाचे हायस्कूल झाल्यानंतर या शाळेच्या वैभवाला हळूहळू घरघर लागली. मजबूत बांधकाम, दगडी व्हरांडा आणि नीटनेटकेपणा असल्याने या शाळेने आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवले आहेत. परंतु  आधुनिक आणि डिजिटल युगात ही शाळा अखेरची घटका मोजू लागली आहे.