विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये : शौमिका महाडिक

0
194

टोप (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेले शेती विधेयक हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताचे आहे. विरोधकांनी राजकीय हेतू ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असे मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले. पुलाची शिरोली येथील बाप्पा फाउंडेशनतर्फे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन थेट शेतकरी संवाद व शेतीविषयक कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

सौ. महाडिक म्हणाल्या की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य  साधून पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी हे विधेयक शेतकरी हिताचे कसे आहे हे पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या त्यांच्या संवादातून शेतकऱ्यांना कृषी विधेयक हिताचे आहे याबाबत विश्वास निर्माण होईल.

या कार्यक्रमास पं. स. सदस्य डॉ. सौ. सोनाली पाटील, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कदम, कृष्णात खवरे,  नारायण मोरे,  रामभाऊ बुडकर, पांडुरंग तावडे,  बाबासाहेब गुरव, प्रकाश कौंदाडे, ग्रा. पं. सदस्या सौ. पुष्पा पाटील, मीनाक्षी खटाळे, श्वेता गुरव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बाप्पा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक तर सोनाली पाटील यांनी आभार मानले.