कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात महाराष्ट्राला सर्वांत जास्त कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळाले आहेत. राज्यातील ३ मंत्री आपल्या कोल्हापूरचे आहेत. तरीही भारतामध्ये सगळ्यात जास्त मृत्युदर असणाऱ्या ३ मंत्र्यांच्या आपल्या कोल्हापूरला कोरोना लशीचा तुटवडा का भासत आहे, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी जि. प. च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली आहे. त्यांची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

 

 

महाडिक यांनी यामध्ये म्हटले आहे की, रोज कामानिमित्त बाहेर पडावं लागणाऱ्यांना अजून एकही डोस नाही. अनेकांचे ८४ दिवस पूर्ण झाले; मात्र दुसरा डोस घेण्यासाठी लस उपलब्ध नाही. कोल्हापुरातील अनेकजण सांगली, कन्हाड, सातारा किंवा अन्य परजिल्ह्यात जाऊन लसीकरण करून घेत आहेत. जिल्ह्यातील मंत्री मात्र केंद्र सरकारकडून राज्याला जेमतेम साठा उपलब्ध होत असल्याचे सांगतात. राज्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण साठ्यापैकी बहुतांश लसही पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांसाठी पाठवली जाते. या जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात कोरोनाबाधित व मृत्यूचा दर जास्त आहे, तरीही कोल्हापूरला राज्यातील एकूण लशींपैकी जास्त साठा का मिळत नाही याचे उत्तर आता या मंत्र्यांनीच द्यावे.