कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या गोकुळच्या टॅंकरच्या बिलावरून पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर त्याला गोकुळच्या संचालक सौ. शौमिका महाडिक यांनी थेट  प्रत्युत्तर देऊन टँकरच्या माध्यमातून चुकीचे काही झाले असेल तर गुन्हे दाखल करावेत असे आव्हान दिले. त्याबरोबरच त्यांनी आज (बुधवार) ‘गोकुळ’मधील दूध वाहतुकीच्या भाड्याबाबत मागील दहा वर्षांतील सविस्तर माहिती संघाच्या कार्यकारी संचालकांकडे मागितली आहे.

गोकुळ दूध संघातील दूध वाहतुकीच्या भाड्याबाबत आणि टॅंकरच्या ठेक्याबाबत महाडिक-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही झडत आहेत. यावरून ‘गोकुळ’मधील दूध वाहतुकीच्या २००९ ते २०२१ पर्यंतच्या दहा वर्षांतील भाड्याबाबतची माहिती शौमिका महाडिक यांनी व गोकुळचे कार्यकारी संचालक यांच्याकडे माहिती मागितली आहे. त्यांनी यामध्ये गोकुळ दूध संघ ते मुंबई पुणे आणि सर्वच चिलिंग सेंटरमधून किती वाहतूक झाली? आणि ती कोणकोणत्या वाहतूक कंत्राटदारांमार्फत झाली ? त्यांना वर्षनिहाय किती भाडे अदा केले ? वेंकटेश्वरा गुड्स मोटर्स प्रा. लि. या संस्थेला दूध वाहतूक करताना इतर कंत्राटदारांपेक्षा अथवा व्यतिरिक्त कोणता वेगळा दर किंवा वेगळ्या सवलती दिल्या आहेत ? या संस्थेला दूध वाहतूक केलेली बिले पाच दिवसाला  आदा केली आहेत ? की इतर ठेकेदारांप्रमाणे अदा केली आहेत ? वेंकटेश्र्वरा गुड्स मूव्हर्स प्रा. लि. यांनी दूध वाहतूक ठेका कामांमध्ये सन २००९ ते २०२१ या सालात कोणता आर्थिक गैरव्यवहार केला आहे का? असे लेखापरीक्षण अहवालात निदर्शित केले आहे का?दूध वाहतूक टेंडर काढून ठरवले जातात का? तसेच कोल्हापूर, सांगली व इतर दूध संघाच्या मुंबई दूध वाहतुकीचे दर व अंतर किलोमीटरमध्ये किती आहे याबाबत तुलनात्मक माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

याद्वारे शौमिका महाडिक यांनी सत्तेवर आलेल्या आघाडीकडून महाडिक कुटुंबाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येऊ नये यासाठी अगोदरच सावध भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.