नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांचे पती, काँग्रेस खासदार शशी थरूर यांना दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने बुधवारी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदा यांचा मृतदेह २०१४ साली दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये सापडला होता. शशी थरूर यांच्यावर सुनंदाचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. निर्दोष मुक्तता झाल्याचा निर्णय आल्यानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानत मी मागील ७ वर्षांपासून वेदना आणि छळ सहन करत होतो.

विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी निकाल देताना हे प्रकरण रद्द केले. थरूर यांच्यातर्फे वकील विकास पहवा न्यायालयात हजर झाले होते. राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव उपस्थित होते. कार्यवाही व्हर्चअली (ऑनलाइन) केली गेली. थरूर यांचाही यामध्ये सहभाग होता. न्यायालयाने १२ एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

सुनंदा पुष्कर यांची मैत्रीण, ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंह यांनी निवेदनात म्हटले होते की, थरूर हे मेहर तरार नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सुनंदा यांनी त्यांना सांगितले होते की, थरूर आणि मेहर जून २०१३ मध्ये दुबईच्या एका हॉटेलमध्ये तीन रात्री एकत्र राहिले होते. एका दिवशी सुनंदाने नलिनीला फोन केला, तेव्हा ती खूप दुःखी होती. थरूर आणि मेहेर यांच्यांमध्ये मॅसेजमधून संभाषण होते. एका संदेशात असेही लिहिले होते की, शशी थरूर निवडणुकीनंतर सुनंदाला घटस्फोट देण्याची तयारी करत होते.

१७ जुलै २०१४ रोजी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला. तेथील एका आलिशान खोलीतील बेडवर त्यांचा मृतदेह आढळून आला. प्रदीर्घ तपासानंतर दिल्ली पोलिसांनी तिचा पती शशी थरूर याच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.