नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या उंचीचा नेता आज राजकारणात नाही. आजही देशातील सर्व प्रमुख, राजकीय पक्षांचे नेते हे शरद पवारांना आदर, मान देतात. ते आम्हा सर्वांसाठी महत्वाचा आहे, असे शिवसेना नेते व खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भेटीत त्यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.  काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी अशक्य असल्याचे त्यांना सांगितले. राहुल गांधींनी पुढाकार घेतला याचा अर्थ शरद पवारांनी घेऊ नये, असा होत नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात कोण कोणाला खांद्यावर घेऊन वाढवत होतं हे संपूर्ण देशाला माहिती आहे. माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल, म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य आणि खासकरुन विरोधकांचं आरोग्य चांगलं राहावं अशी माझी अपेक्षा आहे, असे उत्तर राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला दिले.