शरद पवारांची रात्री शस्त्रक्रिया ; सकाळी ठणठणीत

0
185

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पोटदुखीचा त्रास वाढल्याने मंगळवारी रात्री त्याच्यावर तातडीने ब्रीच कँडी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवार) सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात पवार वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत.

सुप्रभात, ब्रीच कँडी रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिचका आणि स्पोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्र वाचन करत आहेत, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. फोटोमध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचन करताना दिसत आहेत.

पवारांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले आहेत. त्यांना पुढील दहा दिवस  रूग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. अमित मायदेव यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहाटे ४ वाजता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे माध्यमांना सांगितले. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेनंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे. यात शस्त्रक्रियेनंतरही पवार ठणठणीत असल्याचे दिसत आहेत.