बारामती (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार यांनी सांगून यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी केली होती. यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या नेत्याचे आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणातून आणखी नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.