मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी सायंकाळी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या .  त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर ३१ मार्चरोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.  

मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडं अस्वस्थ वाटत होते. काल संध्याकाळी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,  असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.