मुंबई (प्रतिनिधी) : शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, अशा शब्दांत  भाजप नेत्या व माजी मंत्री  पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाबद्दल ट्विट करून आदर व्यक्त केला आहे.

ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. यावेळी शरद पवार यांच्यासह पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

या बैठकीत ऊसतोड कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  घेण्यात आला. कामगारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाच्या झपाट्याबद्दल कौतुक करणारे ट्विट केले. कोरोनाच्या संकट काळातही पवारांकडून सातत्याने भेटीगाठी आणि दौरे सुरूच आहेत. त्यांच्या या दौरे करण्याच्या आणि बैठका घेण्याच्या उत्साहाला पंकजा यांनी  सलाम करून त्यांच्या  कामाविषयी आदर व्यक्त केला आहे.